Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार आज अवकाळी पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ मार्च ।। होळीनंतर राज्यात काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि वातावरणात मोठा बदल झाला. आता परत एकदा पारा चढल्याचे बघायला मिळतंय. काही ठिकाणी तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पार तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. होळीच्या अगोदरच दोनदा हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला. बुधवारपेक्षा आज वातावरणात उष्णता आणि उकाडा अधिक जाणवणार आहे, असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कडकडाटासह पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वारे ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच लातूरला अवकाळी पावसाने झोडपल्याचे बघायला मिळाले.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपार, संध्याकाळपर्यंत मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २३°C च्या आसपास असेल. आजही दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अवकाळीच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे अनेक शहरांमध्ये उन्हाच्या झळा या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. दुपारच्यावेळी घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी.

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यामध्ये पावसाच हजेरी
कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात पावसाने हजेरी लावली. अकोल्याच्या तापमानाची नोंद काल ४१.४ अंश सेल्सिअस नोंदवली गेली. जळगाव, चंद्रपूर, अमरावतीमध्ये पारा ४० वर पोहोचला होता. परभणी, वाशिम, वर्धा मालेगाव, यवतमाळ धुळे याठिकाणी ३९ अंशावर तापमान गेल्याचे बघायला मिळाले. पुणे येथेही पारा आज वाढण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये काल पारा ३८ अंशावर पोहोचल्याचे बघायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *