महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। गुरुवार दि. २७ मार्च ।। पुण्यामध्ये मागील वर्षी कल्याणीनगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणाची देशभरात चर्चा पाहायला मिळाली होती. या अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्श कारने दुचाकीवरून चाललेल्या तरूण आणि तरूणीला धडक दिली होती. दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्ररणामध्ये पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अग्रवाल यांच्या नातवाचे यात नाव समोर आले होते. आरोपी अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून निबंध आणि वाहतुक नियंत्रण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यावर आणि त्याला मिळालेली शिक्षा पाहून सर्वांनाच राग अनावर झाला. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईला आणखी वेग आला होता. धनाढ्य बापाच्या मुलाला शिक्षा मिळाली होती. अशातच या प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे.
कल्याणीनगर येथील पोर्श अपघात प्रकरणात निलंबित केलेल्या तत्कालीन पोलिस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे पाठविला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी दिली. संबंधितांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी २४ मे २०२४ या दिवशी सेवेतून निलंबित केले होते.
निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक निरीक्षक विश्वास तोडकरी असे प्रस्ताव पाठविलेल्या दोन अधिकाऱ्यांचे नाव आहे. कल्याणीनगरमध्ये १८ मे २०२४ या दिवशी मध्यरात्री पबमधून पार्टी करून परतत असताना भरधाव पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन कारचालकावर या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यात अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यात दोघे दोषी आढळले. त्यानुसार त्यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांना पाठविल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली.