महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. २८ मार्च ।। गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा दिवस आता दोनच दिवसांवर येऊन उभा आहे. त्याआधी सोन्याच्या दरांनी महागाईची गुढी उभारली आहे, ज्यामुळे मराठी नवीन वर्षाआधीच ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. जागतिक तसेच देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत कमी होण्याची चिन्हेच दिसत नाही. गुरुवारी राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरांनी ९१,००० रुपयांची पातळी ओलांडली आणि यामुळे आता ग्राहकांना प्रति १० ग्रॅम खरेदीसाठी ९१,०५० रुपये मोजावे लागतील. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरवाढीला चालना मिळत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे सोन्याचे भाव वधारले असून गुंतवणूकदार आता यूएस फेड रिझर्व्हच्या धोरणांवर लक्ष ठेवून असतील.
सोन्याचे भाव वाढता वाढेच
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली असून पुढेही दरवाढीचा ट्रेंड सुरु राहील असा विश्लेषकांचा अंदाज आहे. यामागची प्रमुख करणे म्हणजे की सर्वप्रथम जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चितता कायम आहे तर, अनेक देशांमध्ये महागाई दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तसेच भू-राजकीय तणाव वाढत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे व्यापार युद्धाचा धोकाही वाढला आहे. या दरम्यान, गोल्डमन सॅक्सने सोन्याच्या किमतींचा अंदाज बदलला आहे.
गोल्डमन सॅक्सने म्हटले की २०२५ च्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति औंस ३,३०० डॉलर्सपर्यंत पोहचू शकते. याआधी जागतिक इन्व्हेस्टमेंट बँकेने ३,१०० डॉलर्सचा अंदाज वर्तवला होता. ETF मध्ये वाढती गुंतवणूक आणि मध्यवर्ती बँकांकडून सतत होणारी सोन्याची मागणी लक्षात घेता बदल करण्यात आला आहे. तसेच गोल्डमन सॅक्सने पूर्वीच्या ५० टनच्या उलट आता मध्यवर्ती बँका दरमहा ७० टन सोने खरेदी करतील, असा अंदाज वर्तवला आहे.
या वर्षी सोन्याच्या किमतीत आतापर्यंत १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर व्यापार धोरणांमुळे आर्थिक तसेच भू-राजकीय चिंता निर्माण झाल्या, ज्यामुळे सोन्याची मागणी सतत वाढत आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमध्ये अचानक बदल आणि विलंब झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने अधिक आकर्षक बनले आहे.
सोन्याची दरवाढ आणखी किती?
गोल्डमन सॅक्सच्या आधी बँक ऑफ अमेरिका (BofA) ने देखील २०२५ आणि २०२६ साठी सोन्याच्या किमतींचा अंदाज वाढवला होता. BofA ने म्हटले की अमेरिकेच्या व्यापार धोरणांमुळे अनिश्चितता कायम आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींना बळ मिळत आहे. तसेच २०२५ मध्ये सोन्याची सरासरी किंमत प्रति औंस $३,०६३ आणि २०२६ मध्ये $३,३५० असण्याचा बोफाचा अंदाज आहे.
दुसरीकडे, गोल्डमन सॅक्सनेही मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या मागणीचा अंदाज वाढवला. अमेरिकेच्या धोरणांबाबत अनिश्चितता असताना आणि चीन देखील सतत सोने खरेदी करताना, यामुळे सोन्याच्या किमती वाढू शकतात. तसेच चीन पुढील ३ ते ६ वर्षे सोने खरेदी करत राहील असा गोल्डमन सॅक्सचा अंदाज आहे.