महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. २९ मार्च ।। शुक्रवारी चेपॉकवर झालेल्या सामन्यात चेन्नईला विजयाची गरज होती मात्र टीमचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी तरीही मैदानात लवकर उतरला नाही. या सामन्यात रविचंद्रन अश्विननंतर धोनी फलंदाजीसाठी उतरला तेव्हा चाहत्यांसह अनेक क्रिकेट तज्ञ आश्चर्यचकित झाले. चेन्नईला सामना जिंकण्यासाठी गरज असताना धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. हे पाहून सगळेच हैराण झाले. ज्यावेळी टीमला त्याची गरज होती, तेव्हा धोनी एवढ्या खालच्या फलंदाजीसाठी का उतरला, असा प्रश्ना सर्वांच्या मनात आहे.
ज्यावेळी धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला तेव्हा बराच गदारोळ झाला होता. सोशल मीडियावर देखील युजर्सने धोनीला ट्रोल केलं. त्याचबरोबर भारताचा माजी ऑलराऊंडर आणि एमएस धोनीसोबत खेळणारा इरफान पठाणनेही त्याच्या नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यावर नाराजी व्यक्त केलीये.
काय म्हणाला इरफान पठाण?
धोनीबाबत इरफान पठाणने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक पोस्ट केलीये. पठाण म्हणालाय की, मी धोनीच्या 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्याच्या निर्णयाची बाजू कधीच घेणार नाही. हे संघासाठी योग्य नाही
…तर चित्र काही वेगळं असतं
९व्या क्रमांकावर फलंदाजीला येत एमएस धोनीने 16 चेंडूत 187.50 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 30 रन्स केले. त्याने आपल्या डावात 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. असं असलं तरीही धोनी फारच उशीरा मैदानात उतरल्याचं सर्वांचं म्हणणं आहे. जर तो थोडा वर फलंदाजीसाठी आला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
सोशल मीडियावर धोनी ट्रोल
माजी कर्णधार एमएस धोनीच्या निर्णयाने सीएसके चाहते देखील चांगलेच संतापले होते. सोशल मीडियावरील कमेंट्सवरून त्यांना धोनीचा राग आल्याचं स्पष्टपणे दिसून येत होतं. 9व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा हा धोनीचा निर्णय होता. धोनीपूर्वी अश्विन फलंदाजीला आला तेव्हाही नाराज असलेल्या चाहत्यांचा राग आणखी वाढला.