महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शनिवार दि. २९ मार्च ।। बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या इंडियन प्रिमिअर लीगच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 197 धावांचा पाठलाग करताना 13 व्या ओव्हरलाच मैदानात उतरण्याची संधी असताना धोनी अगदी 17 व्या ओव्हरला मैदानात उतरल्याचं पाहून चाहत्यांचाही हिरमोड झाला. संघाला 43 बॉलमध्ये 98 धावांची गरज असताना धोनीने वर फलंदाजीला येत सामना जिंकून द्यायला हवा होता, असं मत अनेक चाहत्यांनी नोंदवलं आहे. मुळात धोनी एवढा खाली फलंदाजीसाठी का आला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं उत्तर स्वत: धोनीनेच दिलं आहे. जिओ हॉट स्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो एवढ्या तळाला फलंदाजीसाठी काय येतो याबद्दल भाष्य केलं असून भविष्यातही चाहत्यांना धोनी तळाशीच फलंदाजी करताना दिसेल असंही सूचक पद्धतीने सांगितलं आहे.
धोनीने काय कारण दिलेलं?
सध्या सुरु असलेलं आयपीएलचं 18 व्या पर्वाआधी धोनीने दिलेल्या मुलाखतीमध्ये मागील काही काळापासून तो सातत्याने तळाशी का फलंदाजीला येतोय हे सांगितलं होतं. त्यामध्ये त्याने मागील वर्षी शुभ दुबे आणि रविंद्र जडेजा या दोघांना फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये प्रमोट करण्याचा आणि संधी देण्याचा हेतू होता, असं सांगितलं. मागील वर्षाच्या शेवटला झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये दोघांची निवड व्हावी या हेतूने आपण त्यांना अधिक संधी देण्याचा प्रयत्न करत होतो असं धोनी म्हणाला. आपल्या आधी फलंदाजीला जाणारे चांगले खेळत नाहीत अशी कोणतीही तक्रार नसून मी तळाला फलंदाजीसाठी आल्याने संघाला तोटा होतोय असंही काही नसल्याचं धोनीने म्हटलं होतं.
दोन षटकार आणि चौकार लगावला पण…
शुक्रवारच्या सामन्यात आरसीबीविरुद्ध सॅम करन, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्वीन यांनीही धोनीच्या आधी फंलदाजी केली. अश्वीनची विकेट गेल्यानंतर 17 व्या ओव्हरला धोनी फलंदाजीसाठी आला. सामन्यातील शेवटच्या ओव्हरला धोनीने दोन षटकार आणि एक चौकार लगावत नाबाद 30 धावा केल्या. मात्र याचा सामन्याच्या निकालावर काहीही परिणाम झाला नाही. यंदाच्या पर्वातील चेन्नईच्या पहिल्या सामन्यामध्येही धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. चेन्नईने हा सामना जिंकल्यात जमा होता. चेन्नईला जिंकण्यासाठी अवघ्या चार धावा हव्या होत्या तेव्हा धोनी फलंदाजीसाठी आला.
धोनी म्हणतो, संघाचं नुकसान नाही
“माझ्या गुडघ्याला काही अडचणी आहेत. मागील वर्षापेक्षा यंदा अधिक चांगली स्थिती आहे. यंदा टी-20 वर्ल्डकपचं सिलेक्शन आहे. आमच्या संघाकडे पाहिल्यास कोणाला संधी मिळू शकते? रविंद्र जडेजा आणि शिवम दुबेचं नाव घेता येईल. त्यामुळे तुम्ही नक्कीच त्यांना संधी देणार. मी या शर्यतीत नव्हतो कारण मी त्या जागेसाठी इच्छू नाही,” असंही धोनी म्हणाला. “ते वर फलंदाजी करणारे चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना वर फलंदाजीला पाठवल्याने संघाचं नुकसान होतंय असं नाही. प्रत्येकजण जबाबादारीने आपली भूमिका पार पाडत असतील आणि माझ्यावरील ताण यामुळे कमी होत असेल तर असं का करु नये?” असा सवाल धोनीने विचारलेला.