महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल ।। पुणे शहरात आज (मंगळवार दि. १ एप्रिल) ते गुरुवार (दि. ३ एप्रिल) असा तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर घाटमाथ्याला १ व २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील आठ शहरांना मंगळवार आणि बुधवारी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. यात पुणे घाटमाथ्याचा समावेश आहे. त्यामुळे १ आणि २ एप्रिल रोजी पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
अवकाळी पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून किंचित दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पावसामुळे तापमानात दोन अंशांनी घट होऊन पारा २ ते ५ एप्रिलदरम्यान ४० वरून ३६ अंशांवर खाली येईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’, तर तीस जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’चा देण्यात आला आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये ८८ ते ११२ टक्के वळीव पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, एप्रिल ते जूनदरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असाही अंदाज वर्तवला आहे.
हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात वळवाला आजपासून (मंगळवार) सुरुवात होत आहे. यात हिमालयापासून ते पूर्वोत्तर भारत, मध्य भारत, मध्य प्रदेश महाराष्ट्र ते दक्षिण भारत असा संपूर्ण देशात वळवाचा प्रभाव १ ते ४ एप्रिल या कालावधीत राहील. महाराष्ट्रात मात्र १ ते २ एप्रिल हे दोन दिवस सावधानता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कारण या कालावधीत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
असे आहेत अलर्ट
ऑरेंज अलर्ट :
पुणे (१, २), सातारा (२), जळगाव (१), नाशिक (१), अहिल्यानगर (१), छ. संभाजीनगर (१, २), जालना (१, २), गोंदिया (२).
यलो अलर्ट :
ठाणे (१, २), रायगड (१, २), रत्नागिरी (१, २), सिंधुदुर्ग (१ ते ४), धुळे (२), नंदुरबार (२), जळगाव (२), नाशिक (२), अहिल्यानगर (२), कोल्हापूर (१ ते ४), सातारा (१, ३), सांगली (१ ते ४), छ. संभाजीनगर (१, ३), जालना (३), परभणी (४), बीड (२, ३), नांदेड (४), लातूर (३, ४), धाराशिव (३, ४), अकोला (१, २), अमरावती (१, २), भंडारा (१ ते ४), चंद्रपूर (३, ४), गडचिरोली (३, ४), गोंदिया (३, ४), नागपूर (२, ३), वर्धा (३, ४), वाशीम (२, ३), यवतमाळ (३).