महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ एप्रिल ।। शहरातील रस्ते, बाजार, बसस्थानक, दवाखान्यांमध्ये तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी उष्माघात प्रतिबंधासंदर्भात प्रत्येक विभागामध्ये योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत उष्माघात प्रतिबंधक कृती योजनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधावा तसेच संबंधित विभागाद्वारे करण्यात येणाऱ्या उपाययोजनात्मक कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर शहरात तापमानात होणारी वाढ बघता महापालिकेकडून उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना करण्यात येत आहेत. याचअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेच्या सर्व इमारतींसह काही घरांच्या छतावर ‘हिट रिफ्ल्केटिव्ह पेंट’ अर्थात सूर्यप्रकाश परावर्तित करणाऱ्या रंगांचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे घरातील उष्णतेत किती घट होते, याचा सविस्तर अभ्यास करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिका मुख्यालयात उष्माघात प्रतिबंधासाठी झालेल्या बैठकीत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दीर्घ आणि लघु कालावधीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. उष्माघातापासून बचाव व्हावा, याहेतूने यूएनडीपीद्वारे सर्वेक्षण करून शहरातील संभाव्य उष्माघात प्रभावित भाग निश्चित करण्यात आले आहेत. या भागांची माहिती मनपा बैठकीत सादर करण्यात आली. या भागांमध्ये प्रभावीपणे उपाययोजनांचे निर्देश आयुक्तांनी दिले.
यूएनडीपीच्या यादीनुसार, सर्वेक्षणात प्रभाग १२ मधील धैर्यशील कॉलनी, प्रभाग १७ मधील कॉटन मार्केट आणि गणेशपेठ बसस्थानक, प्रभाग आठमधील इतवारी आणि बोरियापुरा, प्रभाग १३ मधील रेशीमबाग मैदान, प्रभाग ३० मधील हरपूर स्टेडियम आणि जुमैरान बाजार, प्रभाग २४ मधील कळमना मार्केट, प्रभाग २६ मधील भांडेवाडी डम्पिंग यार्ड, प्रभाग १५ मधील सीताबर्डी मार्केट, प्रभाग २१ मधील धान्य बाजार या भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये प्रभावीपणे उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
प्रभावित क्षेत्रांसह शहरात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे यासाठी माठ, कॅन किंवा नळांद्वारे पाण्याची सोय करण्याबाबतही आयुक्तांनी सूचित केले. याशिवाय संपूर्ण शहरासह विशेषत: प्रभावित भागांमध्ये स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पाणपोई उभारण्याबाबतही पुढाकार घेण्याची सूचना त्यांनी केली. पाणपोई, सिग्नलवर सावलीकरिता ग्रीन नेट लावणे, उद्याने दुपारी सुरू ठेवून तिथेदेखील पिण्याचे पाणी, ग्रीन नेटची व्यवस्था करून ‘कूलिंग पॉइंट’ तयार करणे, त्याची माहिती देणारे बॅनर उद्यानाच्या दर्शनी भागात लावण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.