महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ एप्रिल ।। महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि पीएनजी (पाइप नॅचरल गॅस) यांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) इतर भागांतील ग्राहकांना आता गॅससाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
नवीन दरानुसार, सीएनजीच्या किमतीत 1.50 रुपये प्रति किलोने वाढ झाली असून आता दर 79.50 रुपये प्रति किलो झाला आहे. तसेच, पाइपद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पीएनजी गॅसच्या दरात 1 रुपयांची वाढ होऊन तो दर 49 रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर झाला आहे.
गॅस सिलेंडरच्या दरात यापूर्वीच 50 रुपयांची वाढ झाली होती, त्यामुळे नागरिकांवर महागाईचा डोंगर कोसळल्याचे चित्र आहे. ही वाढ इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. नवीन दर ९ एप्रिल २०२५ पासून लागू होणार असून याचा थेट परिणाम घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांवर होणार आहे.