महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ एप्रिल ।। राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून, मंगळवारी (दि. 8) विदर्भातील अकोला शहराचा पारा यंदाच्या हंगामात सर्वाधिक 44.2 अंशांवर गेला होता. त्यापाठोपाठ अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्ये कमाल तापमान 43 अंशांवर गेले होते. पुण्याचे तापमान 42.2 अंशांवर होते.
दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला गुरुवार (दि. 10) पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या भागात कमाल तापमान 45 ते 46 अंशांपेक्षा जास्त जाईल, असा अंदाज आहे.
मंगळवारचे कमाल तापमान
अकोला 44.2, अमरावती 43.6, ब्रह्मपुरी 43.8, चंद्रपूर 43.6, नागपूर 42.4, वर्धा 42, यवतमाळ 42, पुणे (लोहगाव) 42.2, अहिल्यानगर 40.1, जळगाव 42.5, कोल्हापूर 38.7, महाबळेश्वर 33.2, मालेगाव 41.6, नाशिक 40.3, सांगली 38.8, सातारा 39.7, सोलापूर 42, छत्रपती संभाजीनगर 41, परभणी 42 आणि बीड 41.9.
विदर्भासह सहा राज्यांना अलर्ट
देशातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणासह महाराष्ट्रातील विदर्भाला उष्णतेच्या लाटेचे रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत. आगामी पाच दिवसांत या भागांतील तापमान 45 ते 46 अंशांवर जाईल, असा अंदाज आहे.
सौराष्ट्रात पारा 45.5 अंशांवर
गत 24 ते 48 तासांत देशासह राज्याच्या तापमानात मोठी वाढ झाली असून, पारा 44 ते 46 अंशांवर गेला आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागांत उष्णतेची लाट तीव्र आहे; तर देशात पश्चिम राजस्थान, कच्छ, सौराष्ट्र आणि गुजरातमधील बहुतांश भागात उष्णतेची लाट तीव्र आहे. राजस्थानातील बाडमेर, सौराष्ट्रातील कांडला येथे मंगळवारी 45.5 अंशांवर पारा गेला होता. त्यामुळे हवामान विभागाने या भागांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. देशाच्या कमाल तापमानात 6 ते 8 अंशांनी वाढ झाली आहे.