महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ एप्रिल ।। महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि दक्षिण भागासह उर्वरित क्षेत्रात सध्या जिल्ह्याजिल्ह्यानुसार हवामानात बदल होत आहेत असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. पुढच्या 24 तासांतच नव्हे, तर हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढले चार दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा दाह सोसेनासा होत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळीचे ढग घोंगावताना दिसत आहेत. तर, मध्य महाराष्ट्रसुद्धा या तडाख्यातून बचावणार नसल्याचा इशारा देण्यात येत आहे. हवामान विभागनं प्रामुख्यानं हिंगोली जिल्ह्याला ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा दिला असून, लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या भागांमध्ये पुढच्या 48 तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकिकडे विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळीचा इशारा जारी करण्यात आलेला असतानाच दुसरीकडे मात्र राज्यात ढगाळ वातावरणामुळं सूर्याची किरणं तीव्र नसली तरीही उष्मा मात्र कासाविस करणार आहे याची दक्षता नागरिकांनी घ्यावी.
राज्यात का वारंवार सुरुय अवकाळीचं सत्र?
काही दिवसांपासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळून गेला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, याचमुळं तयार होणाऱ्या स्थितीमुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत आहे. वाढत्या उष्णतेमुळं बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला वेग आल्यानंही पावसाचा अनपेक्षित शिडकावा पाहायला मिळत आहे.
या होरपळीमध्येच राज्यात तापमानाच चढ-उतार सुरू असले तरीही त्यात फारशी घट होत नसल्यामुळं त्याचा नागरिकांना फारसा दिलासा मिळत नाही. एकंदरच आठवड्याच्या शेवटीसुद्धा हवामानानं चांगलाच चकवा दिल्यानं या सातत्यपूर्ण बदलांना आरोग्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं जात आहे.
दरम्यान, या हवामानबदलांना काही कारणं ही मानवनिर्मित असून त्यांकडे दुर्लक्षही करता येत नाही. बहुतांश ठिकाणांच्या भौगोलिक रचनेपासून ते अगदी तिथं होणाऱ्या विकासाचे परिणाम आता हवामानावर स्पष्टपणे दिसू लागले आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांसह शहरालगत असणाऱ्या भागात कैक ठिकाणी पुनर्विकास आणि अनेक बांधकामाधीन प्रकल्पांमुळे काँक्रिटीकरणाची वाढ झाली आहे. ज्यामुळं मातीचा भूभाग कमी होत असून, जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता कमी झाली आहे. परिणामस्वरुप नैसर्गिकरित्या निर्माण होणारा गारठा घटत असून, भूभागावरील पाण्याचं अतिशय वेगानं बाष्पीभवन होताना दिसत आहे.