Raj Thackeray on Hindi Language: ‘तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ’ ; हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आक्रमक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्यात आली आहे. या नव्या शैक्षणिक धोरणावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवातीपासून मराठी भाषेसाठी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता हिंदी सक्तीच्या विरोधातही राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. “आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे”, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’ तयार केला असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून सक्तीची करण्यात आली आहे. तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत. या निर्णयानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

सरकारचा डाव समजून घ्या
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून हिंदी सक्तीचा विरोध केला आहे. राज ठाकरे म्हणाले, “या सगळ्याकडे पाहिले तर लक्षात येते की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे, असे काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.”

मनसे हे खपवून घेणार नाही
बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. “ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? आणि करून तर बघा, तिथली सरकारेच पेटून उठतील. महाराष्ट्रातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळे खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. बाकीच्यांचे आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणेघेणे पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही”, अशा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

हिंदीची पुस्तके दुकानात विकू देणार नाही
“महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तके दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तके विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी”, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *