![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ एप्रिल ।। विरार ते खारवाडेश्री (सफाळे) अशा बहुचर्चित रो-रो सेवेचा शुभारंभ आज, शनिवारपासून प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मे. सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. संस्थेद्वारे रोरो फेरीबोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा सरू होताच सफाळे ते विरारचे अंतर केवळ १५ मिनिटांत गाठता येणार आहे. सध्या हे अंतर पार करायला रस्तेमागनि एक ते दीड तासांचा वेळ लागतो, आता समुद्रमार्गाने प्रवासाचा वेळ वाचणार आहे, तसेच इंधनाचीही बचत होणार आहे.
वसई, विरार आणि मिरा रोड, भाईंदर शहरांदरम्यान रो-रो सेवा मागील वर्षांत सुरू करण्यात आल्यानंतर, आता दुसऱ्या टप्प्यात विरार ते सफाळे म्हणजेच खारवाडेश्री अशी रो-रो सेवा आजपासून सुरू होत आहे. वसई, विरारकरांना रस्ते मार्गाने सफाळे, पालघर गाठण्यासाठी एक ते दीड तासांचे अंतर पार करावे लागते. अहमदाबाद महामार्गाने पालघरला जाण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. तसेच, वाहतूक कोंडीत अडकल्यास वेळ अधिक लागतो.
रस्ते मार्गांबरोबरच रेल्वेने पालघरला जाण्यासाठीही तितकाच वेळ लागतो. त्यात लोकल सेवेची कमतरता असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासाठी वसईप्रमाणे विरार ते पालघरदेखील रो-रो सेवा सुरू करावी यासाठी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता ही सेवा सुरू होत आहे.
विरार ते सफाळे रो-रो सेवेसाठी विरारमधील नारंगी जेट्टी तयार झाली आहे. तर, सफाळेमधील खारवाडेश्री रो-रो जेट्टी उभारण्यात आली आहे. फेरीबोट सेवेचे तिकीट दर प्रायोगिक तत्त्वावर काही महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहे. प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही आणि आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने जनतेसाठी ही सेवा वेळेची बचत करणारी आणि दिलासादायक ठरेल असा विश्वास सागरी मंडळाचा आहे.
प्रवास होणार सुलभ
विरार ते पालघर हा जलमार्ग नागरिकांसाठी, तसेच रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोयीचा ठरणार आहे. या जलमागांमुळे वसई-विरार ते सफाळा-केळवा परिसरात प्रवास करणे सुलभ होणार असून, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, विरार येथून रस्तामार्गे ७० किमीवर असणारे हे अंतर या जलमार्ग सोयीमुळे निम्म्यावर येईल. जलमार्गे हे अंतर केवळ तीन किमीवर येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.
१०० प्रवासी, ३३ वाहने वाहून नेण्याची क्षमता?
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वैतरणा खाडीमध्ये विरार ते खारवाडे श्री दरम्यान सध्या प्रायोगिक तत्त्वावर रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू होणार आहे. सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरिन सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीला ही रो-रो फेरीबोट सेवा चालवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून परवानगी देण्यात आली आहे. एका फेरीत १०० प्रवासी आणि ३३ वाहने वाहून नेण्याची क्षमता फेरी बोटीची असेल, असा अंदाज आहे
