Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा ; आणखी उकाडा वाढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ एप्रिल ।। मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी ऊन अशी स्थिती निर्माण झालीये. मुळात म्हणजे होळीच्या अगोदर पारा वाढताना दिसला. त्यानंतर अचानक राज्यावर अवकाळीच संकट आले आणि जवळपास सर्वच भागांमध्ये अवकाळीने हजेरी लावली. काही ठिकाणी तर गारपिट देखील मोठ्या प्रमाणात झाली. ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. चंद्रपूर, जळगाव, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, वाशिम याठिकाणी जोरदार पाऊस झाला.

अवकाळीचे ढग राज्यापासून दूर
चक्राकर वारे वाहत असल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. वादळी वाऱ्यासह अनेक भागांमध्ये पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे मार्च आणि एप्रिलमध्येही थोडासा थंडावा जाणवला. आता मात्र, अनकाळीचे ढग दूर गेले आहेत. यामुळे राज्यात परत एकदा उष्णता वाढल्याचे चित्र बघायला मिळतंय. मागील तीन ते चार दिवसांपासून उष्णता वाढतंय.

देशात सर्वाधिक तापमानाची नोंद ही राजस्थानच्या बिकानेरमध्ये झालीये. बिकानेरमध्ये ४५.१ अंश सेल्सिअस तापमान होते. अकोल्यामध्येही सूर्य आग ओकताना दिसतोय. अकोल्यात ४४.१ अंश तापमानाची नोंद झालीये. मागील काही दिवसांपासून विदर्भात पारा चढताना दिसतोय. परभणी, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, अमरावती, वाशिम याठिकाणीही ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीये. पुण्यात आज उन्हाचे चटके अधिक जाणवतील.

अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
उन्हाचा पारा वाढत असतानाच आता भारतीय हवामान खात्याकडून अत्यंत मोठा इशारा हा देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण आणि दमट वातावरणाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यात काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलीये. राज्यात उष्णता वाढत असल्याने नागरिकांनी यादरम्यान काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णता अधिक वाढण्याचे देखील संकत आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक शहरांमध्ये ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याचेही संकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *