दहशतवाद्यांना सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा ; राज ठाकरे संतापले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ एप्रिल ।। जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारत हादरला आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन टेकड्यांवर काही पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत होते. मात्र त्याचवेळी अचानक दहशतवाद्यांनी या टेकड्यांवरील मैदानात पोलिसांच्या वेशात प्रवेश केला. दरम्यान या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जातायत. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणालेत राज ठाकरे?
या हल्ल्याचा निषेध करत राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली, असं ठाकरेंनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा, असंही म्हटलंय.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय लिहिलंय?
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली…

एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवा
केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा… १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला… यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत… केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला
या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली… एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला… ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ… या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे…

केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी….

सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा
हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये… आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोंदी भारतात परतले
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. या हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी दौरा सोडून पुन्हा भारतात परतले आहेत. यावेळी केंद्राची उच्च स्तरीय बैठक घेतली जाणार असल्याची माहितीही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *