महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ एप्रिल ।। गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसतोय. होळीनंतर राज्यातील वातावरण पूर्ण बदलून गेले. हेच नाही तर होळीनंतर उष्णता वाढण्याचे संकेत असताना अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. हे अवकाळीचे ढग बरेच दिवस राज्यावर दिसले. मार्च महिन्यातच अनेक ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसवर गेले होते. अवकाळी पावसाचा अनेक भागांमध्ये मोठा फटका बसला. आता राज्यात सूर्य आग ओकताना दिसतोय. चक्क ४५.८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेल्याची स्थिती आहे.
चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
राज्यात काल चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. चंद्रपूरमध्ये ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीये. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलाय. हेच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
फक्त उष्णताच वाढणार नाही तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होईल. कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलीये. यावरून हे स्पष्ट होते की, राज्यावरील अवकाळीचे ढग हे अजून गेले नाहीत. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे ऊन अशी स्थिती सध्या राज्याची आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये काल पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे असल्याचेही बघायला मिळाले. विशेष: दुपारच्यावेळी उन्हाचे चटके अधिक जाणवत आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्य ओकतोय आग
अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये काल ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. परभणी, मालेगाव, गोदिंया, सोलापूर याठिकाणी ४३ तापमानाची नोंद करण्यात आलीये. आज देखील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढणाऱ्या तापमानामुळे दुपारच्यावेळी अंगाची लाहीलाही होत आहे. हेच नाही तर पुढील काही दिवसांमध्ये तापमानात अधिक वाढ होण्याचे संकेत देखील आहेत.