महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ एप्रिल ।। विदर्भात उष्णलाटेचा कहर सुरूच असून, ब्रह्मपुरी येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी देशासह संपूर्ण जगात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. बुधवारच्या तुलनेत आज काही जिल्ह्यांच्या तापमानात घट अवश्य झाली, मात्र उन्हाचे चटके कायम होते.
विदर्भात उन्हाची लाट आणखी एक-दोन दिवस राहणार असून, त्यानंतर ढगाळ वातावरण राहणार असल्याने वैदर्भीयांना ऊन व उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात जवळपास आठवडाभरापासून भीषण उष्णलहर सुरू आहे.
लाटेचा नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये तीव्र प्रभाव दिसून येत आहे. अकोला व चंद्रपूरनंतर आता ब्रह्मपुरी हे विदर्भातील आणखी एक ‘हॉट’ शहर बनले आहे. येथे बुधवारच्या तुलनेत आज ०.३ अंशाची घट होऊन पारा ४५.९ वर आला.
मात्र त्याउपरही येथील तापमान भारतासह संपूर्ण जगात सर्वाधिक ठरले. नागपूरचे तापमान कालप्रमाणे ४४.४ अंशांवर कायम राहिले. याशिवाय अकोला (४५.२ अंश सेल्सिअस), अमरावती (४४.२ अंश सेल्सिअस), वर्धा (४४.० अंश सेल्सिअस), यवतमाळ (४४.४ अंश सेल्सिअस), गडचिरोली (४४.० अंश सेल्सिअस), वाशीम (४३.२ अंश सेल्सिअस), भंडारा (४२.४ अंश सेल्सिअस) आणि गोंदिया (४२.६ अंश सेल्सिअस) येथेही पारा ४२ पार राहिला.
प्रादेशिक हवामान विभागाने २७ एप्रिलपासून विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे.
विदर्भातील तापमान
शहर तापमान
ब्रह्मपुरी ४५.९
चंद्रपूर ४५.०
अकोला ४५.२
नागपूर ४४.४
वर्धा ४४.०
गडचिरोली ४४.०
अमरावती ४४.२
यवतमाळ ४४.४
गोंदिया ४२.६
बुलढाणा ४०.६