महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ एप्रिल ।। सध्या संपूर्ण जग हवामान बदलाच्या समस्येचा सामना करत आहे. हवामान बदलाचा आणि तापमान वाढीचा परिणाम पुण्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. उष्ण हवामानामुळे मलेरियासारखे आजार वाढत आहेत. मलेरिया पसरवणारे अनोफिलीस डास गरम आणि दमट हवामानात सहज वाढतात. त्यामुळे डासांची संख्या वाढते आहे आणि मलेरियाचे रुग्णही वाढत आहेत.
सामान्यतः मलेरिया पावसाळ्यात किंवा त्यानंतर जास्त प्रमाणात वाढतो. मात्र, हवामान बदलामुळे वर्षभर कधीही मलेरियाचा धोका असतो. वाढलेली आर्द्रता डास वाढण्यास योग्य ठिकाण तयार करतात.
शहरात योग्य निचर्याची सोय नसल्यामुळे, उपनगरांमध्ये विशेषतः हडपसर, कात्रज आणि पिंपरी-चिंचवडसारख्या गर्दीच्या भागांमध्ये समस्या वाढते आहे, याकडे रुबी हॉल क्लिनिकचे संसर्गजन्य रोग सल्लागार डॉ. देवाशिष देसाई यांनी लक्ष वेधले आहे.
हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराच्या रुग्ण व्यवस्थापनासाठी राज्यातील 401 वैद्यकिय अधिकार्यांचे प्रशिक्षण पार पडले आहे. यशदा येथे हिवताप या पोर्टलमध्ये हिवतापाची माहिती भरणेसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. पुणे नॉलेज सेंटरच्या वतीने आरोग्य कर्मचार्यांचे साथरोगाच्या अनुषंगाने प्रशिक्षणही पार पडले.
काय काळजी घ्यावी?
पर्यावरणाची स्वच्छता ठेवा.
कुलर, कुंड्या किंवा उघड्या भांड्यात पाणी साचू देऊ नका. कचरा नीट टाका आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
डासांपासून संरक्षण करा. झोपताना मच्छरदाणी वापरा. खिडक्या-दारांवर जाळी लावा. सकाळी-संध्याकाळी हलक्या रंगाचे आणि पूर्ण बाह्याचे कपडे घालावे.
आरोग्याची काळजी घ्या: ताप, अंगदुखी, थरथर अशी लक्षणे दिसली तर दुर्लक्ष करू नका. वेळेवर डॉक्टरांकडे जाऊन चाचणी करून घ्या. स्थानिक दवाखान्यांनीही मलेरियाच्या तपासणीसाठी तयार राहणे गरजेचे आहे.