![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ एप्रिल ।। हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाने भविष्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या मार्गावरील काही प्रमुख मेट्रो स्थानकांजवळील महापालिकेच्या ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील आठ, तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील दोन अशा दहा ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. पुणे महापालिका हद्दीतील १३ हजार ५१ चौरस मीटर जागा या वाहनतळांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ (पीपीपी) स्वरूपात हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग विकसित करण्यात येत आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटर लांचीच्या मार्गासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नागरिकांनी मेट्रोचा अधिकाधिक वापर करावा यासाठी मेट्रो स्थानकाच्या ५०० मीटरच्या परिसरात पार्किंगची सुविधा विकसित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी महापालिकेच्या ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
पार्किंग धोरणाचे काय?
पुणे महापालिकेने मोठा गाजावाजा करून पार्किंग धोरण जाहीर केले होते. हे धोरण सध्या थंड बस्त्यात पडले असून, मेट्रो स्थानकांलगत विकसित केल्या जाणाऱ्या वाहनतळांवर वाहनचालकांकडून काय शुल्क घेतले जाणार, हेसुद्धा ठरवावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच महामेट्रोने वाहनचालकांकडून अवाजवी शुल्क आकारण्याचे कंत्राट दिल्यानंतर त्याला मेट्रो प्रवाशांनी प्रचंड विरोध केला होता. त्यामुळे हे शुल्क स्थगित ठेवण्यात आले होते. मात्र, मेट्रोच्या तिकीट दरांपेक्षा पार्किंगचे शुल्क अधिक असू नये एवढीच अपेक्षा केली जात आहे.
महापालिका हद्दीतील आठ, तर ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील दोन अशा दहा ‘ॲमेनिटी स्पेस’ शोधण्यात आल्या असून, त्या ठिकाणी वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोच्या या मार्गावर २३ स्थानके असून, पुणे महापालिका हद्दीत १४ स्थानके आहेत. या आठ ‘ॲमेनिटी स्पेस’ बालेवाडी आणि बाणेर परिसरातील आहेत. त्यामुळे या परिसरातील मेट्रो प्रवाशांना पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिका हद्दीतील आठ ‘ॲमेनिटी स्पेस’ उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या प्रकल्प विभागासह मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.
