एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ एप्रिल ।। राज्यातील सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल, असे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.

पुण्यात ‘अर्बन डायलॉग-आव्हाने आणि उपाय‘ या कार्यक्रमानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील पाकिस्तानी नागरिकांबाबत माध्यमांत चुकीच्या बातम्या आल्या आहेत. गृहमंत्री म्हणून सांगतो, ‘पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करू नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल.’

पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा दहशवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबीयांवर मोठे संकट आले आहे. त्यामुळे या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देता येईल का त्याबाबत प्रयत्न करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गणबोटे यांच्या कोंढवा येथील निवासस्थानी तर जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जगदाळे यांची पत्नी प्रगती, मुलगी आसावरी व मातोश्री माणिकबाई जगदाळे तसेच त्यांचे इतर कुटुंबीयांचे फडणवीस यांनी सांत्वन केले व तेथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला.

यावेळी जगदाळे कुटुंबीयांनी पर्यटन स्थळांवरील सुरक्षा अधिक मजबूत करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली. काश्मीरमध्ये घडलेल्या त्या घटनेचा संपूर्ण वृत्तांत त्यांनी फडणवीस यांना सांगितला. तसेच मुलगी आसावरी हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *