महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मे ।। लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) महिलांना एप्रिलचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. एप्रिलचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत काही महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाहीये.
मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत एप्रिलच्या हप्त्याबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरेंनी म्हटलंय की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात दिला जाईल.या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.
लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत. दरम्यान, या योजनेतील काही अर्जदार महिलांना एकही रुपया मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्या महिला सरकारी नोकरी करतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.ज्या महिलांकडे चारचाकी वाहने आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एकदा तुम्ही अपात्र ठरला की तुम्हाला यापुढेही कोणत्याही हप्ता मिळणार नाही.