महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मे ।। NEET 2025 उद्या होते आहे. मागच्यावर्षी या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांमुळे यंदा यंत्रणा अधिक सावध आहेत. यंदाही पेपर फुटल्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. खरोखरच पेपर फुटले आहेत का? हे अजून स्पष्ट झालेलं नाही मात्र आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने अशा गैरप्रकारांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी खास पोर्टल सुरू केलं आहे.
उद्या म्हणजे रविवारी ४ मे २०२५ला NEET-UG 2025 होते आहे. वैद्यकीय क्षेत्रांत करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. अतिशय कठीण आणि विद्यार्थ्यांचा कस पाहणारी ही परीक्षा. मात्र गेल्यावर्षी त्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निराशेचं वातावरण पसरलं होतं.
गेल्यावर्षी ५ मे २०२४ला ला झालेल्या NEET-UG परीक्षेदरम्यान, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, मेघालय आणि गुजरातमधील काही परीक्षा केंद्रांवर परीक्षा थोडी उशिरा सुरू झाली. त्यामुळे तेथील काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले. त्यामुळे काहींना तर पैकीच्या पैकी मिळाले पण सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय फेटाळला आणि जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांची ग्रेस मार्कांसहित असलेली गुणपत्रके रद्द केली गेली. दुसरीकडे झारखंडमध्येही एका परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचं उघडकीस आलं होतं.
यंदा परीक्षा घेताना तरी सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)नीट काळजी घेईल अशी विद्यार्थ्यांची आशा होती तोच पुन्हा एकदा पेपरफुटीची चर्चा सुरू झाली. नीट २०२५चे पेपर फुटल्याची चर्चा अनेक समाजमाध्यमांवर सुरू होती.
इतकंच नव्हे तर काही टेलिग्राम चॅनल्स आणि इन्स्टाग्राम अकाऊंटनीसुद्धा नीट २०२५चे पेपर आपल्याकडे असल्याचे दावे केले होते. विद्यार्थ्यांना हे पेपर विकण्याची तयारीही काही चॅनेल्सनी दाखवली होती.
अजूनही नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने पेपर फुटल्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही मात्र, अशाप्रकारचे दावे करून कोणी विद्यार्थ्यांची फसवणूक करत असेल, दिशाभूल करत असेल तर त्याविरुद्ध कारवाई करण्याची मात्र जय्यत तयारी केलेली आहे.
एटीएकडे यासंदर्भात संशयास्पद हालचालीविषयक तब्बल १५०० तक्रारी आल्या आहेत. यातल्या बहुतांश तक्रारी या टेलिग्रामवरील खोट्या पेपर फुटीविषयक आहेत.
त्यामुळेच परीक्षेआधी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने काही टेलिग्राम आणि इन्स्टाग्राम चॅनेल्सवर कारवाईचा बडगा उचलला आहे. सगळ्यात आधी अशा काही चॅनेल्सची ओळख पटवून त्यांची माहिती, पुढील कारवाईसाठी गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राकडे Indian Cyber Crime Coordination Centre (I4C)पाठवण्यात आली आहे.
NTA च्या सूत्रांनुसार, ही कारवाई त्यांना ऑनलाइन पोर्टलवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. एनटीएने हे पोर्टल २६ एप्रिलला सुरू केलं होतं.
तपासादरम्यान NTA ने १०६ टेलिग्राम चॅनेल्स आणि १६ इन्स्टाग्राम अकाउंट्सची ओळख पटवली आहे. या अकाऊंटवरून पेपरफुटीचे दावे केले गेले होते अथवा विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जात होती. NTA ने टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामला या अकाऊंट्स आणि चॅनेल्सवर तात्काळ कारवाई करण्यास सांगितली आहे. शिवाय त्याच्या अॅडमिन्सची माहितीही मागवली आहे.
तक्रार कुठे कराल?
अशा संशयास्पद हालचालींची माहिती नोंदवण्यासाठी NTA ने पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवरून तक्रारी देता येतील.
https://neetclaim.centralindia.cloudapp.azure.com/
कोणत्या तक्रारी देऊ शकता?
– NEET-UGच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याचा दावा करणारी अकाऊंट्स किंवा वेबसाइट्स
– परीक्षेसंबंधी गोपनीय माहिती मिळाल्याचा दावा करणारी व्यक्ती
– NTA किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने फसवी खाती.
कधीपर्यंत तक्रारी करता येणार?
४ मे म्हणजे ज्यादिवशी नीट परीक्षा होणार आहे त्यादिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या पोर्टलवर तक्रारी करता येतील.
कडेकोट सुरक्षेखाली परीक्षा
गेल्यावर्षीच्या गैरप्रकारानंतर एक ७ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या शिफारशींनुसार यावेळी NTA आणि शिक्षण मंत्रालयाने काही कडक उपाययोजना केल्या आहेत.
यावेळी परीक्षा कडेकोट बंदोबस्तात घेण्यात येणार आहे.
यंदा प्रश्नपत्रिका आणि OMR शीट पोलिस संरक्षणात आणल्या जातील.
परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी आणि पोलिस अचानक भेट देऊ शकतील
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.