महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मे ।। भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली जात आहे. सिंधू नदीचे पाणी रोखण्याबरोबरच सीमेवरही कारवाई केली जात आहे. याच दरम्यान, एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे यु ट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर भारत हल्ला करणार असल्याचे विधान करणारे पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांचेही एक्स खाते ब्लॉक करण्यात आले आहे.
पाकिस्तानसोबतचे संबंध पहलगाम हल्ल्यानंतर ताणले गेले आहेत. डिजिटल माध्यमांतूनही कारवाई केली असून, अनेक यु ट्यूब चॅनेल्स भारतात बंद करण्यात आले आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे यु ट्यूब चॅनेलही ब्लॉक करण्यात आले आहे.
शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनेलवर ‘हा कॉन्टेट राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित आदेशांमुळे सध्या उपलब्ध नाहीये. अधिक माहितीसाठी गुगल पारदर्शकता अहवाल बघा’, असा मेसेज दाखवला जात आहे.
पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्र्याचे एक्स खाते ब्लॉक
भारताने पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांचे एक्स खाते ब्लॉक केले आहे. तरार यांच्या एक्स खात्यावर हे खाते रोखण्यात आले आहे, असा मेसेज दिसत आहे.
भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढल्यानंतर अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री एक पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली होती.
‘पाकिस्तानकडे ठोस माहिती आहे की, भारत २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आधार घेऊन पुढील २४ ते ३६ तासांता पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याची शक्यता आहे’, असे तरार म्हणाले होते.
भारताकडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक
बैसरन पठारावरून दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. १६ यु ट्यूब चॅनेल्स बंद करण्यात आली आहेत, ज्यावरून भारताबद्दल चिथावणीखोर, असत्य आणि संवेदनशील स्वरुपातील आशय प्रसारित केला जात होता.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून आता बीबीसीच्या वार्तांकनावरही नजर ठेवली जात आहे. बीबीसीने पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना बंडखोर म्हटले होते.