पुण्यात उन्हाळा ठरतोय तापदायक ! सलग १२ दिवस तापमान ३९ अंशापार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ मे ।। यंदाचा उन्हाळा पुण्यासाठी तापदायक ठरत आहे. एक एप्रिल ते दोन मे या ३२ दिवसांपैकी १६ दिवस पुण्यातील कमाल तापमान ४० अंशांच्या वर नोंदले गेले. गेल्या २० दिवसांमध्ये २० एप्रिल या एका दिवसाचा अपवाद वगळता पुण्यातील तापमानाचा पारा ३९ अंशांच्या वरच राहिला आहे.

यंदाचा उन्हाळा महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांसाठी तापदायक असेल; तसेच उष्णतेच्या लाटांचे दिवसही सरासरीपेक्षा जास्त असतील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे आयएमडी एप्रिलच्या सुरुवातीला वर्तवण्यात आला होता. एप्रिलमध्ये पुण्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचे दिवस सर्वसाधारण राहिले असले, तरी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि पश्चिम विदर्भामध्ये गेल्या महिन्यात कमाल तापमान सरासरीच्या वर नोंदले गेले. पूर्व विदर्भ वगळता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहिले.

पुण्यात एक मे रोजी ४१.२, तर दोन मेला ४०.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्याआधी एक एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत तब्बल २१ दिवस कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांच्या वर राहिला. त्यांपैकी गेले सलग १२ दिवस पुण्यातील तापमान ३९ ते ४१ अंशांच्या दरम्यान नोंदले जात आहे. कमाल तापमान खाली येत नसल्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर, पाणी आणि विजेच्या वापरावरही दिसून येत आहे.

हवामानतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, राज्यात उन्हाळ्यातील कमाल तापमानावर वाऱ्यांची दिशा आणि बाष्प या घटकांचा मोठा प्रभाव असतो. एप्रिलच्या सुरुवातीपासून विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राचा भाग वगळता हवा कोरडी होती. पावसाचे सरासरीपेक्षा कमी प्रमाण आणि उत्तर, वायव्येकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांमुळे तापमान सरासरीच्या वर नोंदले गेले.

मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
आयएमडीने नुकत्याच जाहीर केलेल्या मे महिन्याच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता सर्वसाधारण असून, कोकण आणि मराठवाड्यात किमान तापमान जास्त राहण्याची शक्यता जास्त आहे. मे महिन्यात राज्याच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची सर्वसाधारण शक्यता असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *