महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ मे ।। टीम इंडियाच्या टेस्ट आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. बुधवार 7 मे रोजी रोहितने इंस्टाग्राम स्टोरीवरून ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली असून त्याने यासोबतच भावनिक पोस्ट लिहिली आहे. यापूर्वी टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहितने टेस्ट आणि टी 20 क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो वनडे क्रिकेटमध्ये पुढील काळात खेळत राहणार अशी माहिती त्याने स्वतः दिलीये. मात्र आता रोहितच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाच्या टेस्ट संघाची धुरा कोण सांभाळणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
भारताचा इंग्लंड दौरा :
जून महिन्यात टीम इंडियाचा टेस्ट संघ हा इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार असून यात एकूण 5 सामने होतील. मागील काही दिवसांपासून रोहित शर्माचा टेस्ट क्रिकेटमधील फॉर्म पाहता त्याच्याकडे इंग्लंड दौऱ्यात टेस्ट संघाचं नेतृत्व सोपवलं जाणार नाही अशी माहिती मिळत होती. तसेच बीसीसीआय सिलेक्टर्स टेस्ट संघाचा कर्णधार म्हणून 25 वर्षीय स्टार फलंदाज शुभमन गिलची निवड करण्याच्या विचारात आहे. आता रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार शुभमन गिल हाच आगामी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा नवा कर्णधार असणार हे जवळपास निश्चित आहे.
शुभमन गिलने आतापर्यंत 32 टेस्ट सामने खेळले असून यात त्याने 1893 धावा केल्या आहेत. तसेच यात 5 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. शुभमन गिलने यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. शुभमन गिलचा जन्म हा 8 सप्टेंबर 1999 मध्ये पंजाबमध्ये झाला होता.
काय म्हणाला रोहित शर्मा?
आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत असताना रोहित शर्माने आपल्या चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. यात तो म्हणाला की, ‘सर्वांना नमस्कार, मी फक्त एवढेच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या रंगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक महत्वाचा सन्मान राहिलाय.गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वनडे क्रिकेट फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत राहीन’.
रोहित शर्माची कारकीर्द :
टीम इंडियाचा टेस्ट संघाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माची कारकीर्द अतिशय उत्तम ठरली. त्याने 67 टेस्ट सामने खेळताना 4302 धावा केल्या. दरम्यान त्याने 18 अर्धशतकं, 12 शतकं तर 1 द्विशतक सुद्धा लगावलं. या दरम्यान त्याने गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा घेतल्या आहेत. 2013 रोजी इडन गार्डन स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर त्याचा शेवटचा टेस्ट सामना त्याने 26 डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान खेळला.