महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ मे ।। गुरुवार 8 मे रोजी धर्मशाला स्टेडियमवर चालू सामन्यादरम्यान पाकिस्तान हल्ल्याच्या पाश्ववभूमीवर ब्लॅक आउट करण्यात आले. त्यानंतर सामना रद्द करण्यात आला आणि आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात येत असल्याचे देखील बीसीसीआयने जाहीर केले. भारत – पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती कायम आहे. मात्र आयपीएल 2025 पुन्हा सुरु करण्याबाबत बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून राहिलंय.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने सर्व आयपीएल संघांना मंगळवारपर्यंत एकत्र येण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार आयपीएल 2025 मे महिन्याच्या 30 तारखेपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.
रविवार 11 मे च्या रात्रीपर्यंत बीसीसीआय उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता असून बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद इत्यादी ठिकाणी आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
यापूर्वी आयपीएल 2025 च्या मूळ वेळापत्रकाप्रमाणे 25 मे रोजी आयपीएलचा फायनल सामना खेळवला जाणार होता. मात्र आयपीएल स्थगित झाल्याने पुढील शेड्यूल कव्हर करण्यासाठी जास्त डबल हेडर सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.
प्लेऑफमधील क्वालिफायर 1 आणि 2, एलिमिनेटर तसेच फायनल सामना हा त्याच्या ठरलेल्या ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयपीएल 2025 मधील 74 सामन्यांपैकी 12 लीग स्टेज सामने आणि 4 प्लेऑफ सामने शिल्लक आहेत. यंदा इंडियन प्रीमियर लीगचा हा 18 वा सीजन आहे.
आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे.
जून महिन्यात भारतीय क्रिकेट संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. 20 जून पासून इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येईल. त्यामुळे आयपीएल 2025 स्पर्धा इंग्लंड दौऱ्यापूर्वी संपवण्याचं आव्हान बीसीसीआय समोर आहे.