हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं ; डॉक्टरवर गुन्हा दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ मे ।। कानपूर – अलीकडच्या काळात डोक्यावरचे केस गळणे, टक्कल पडणे यासारख्या समस्येने बरेच जण त्रस्त आहेत. डोक्यावरचे केस साबूत राहावेत यासाठी महागडे शॅम्पू, तेल इत्यादीचा वापर केला जातो. त्याशिवाय काही जण हेअर ट्रान्सप्लांटही करतात. परंतु उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हेअर ट्रान्सप्लांट करणे एका इंजिनिअरच्या जीवावर बेतले आहे. कानपूरच्या पनकी पॉवर प्लांटमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून काम करणाऱ्या विनित दुबे यांनी नुकतेच हेअर ट्रान्सप्लांट केले होते, त्यानंतर विनित यांची तब्येत खालावत गेली.

माहितीनुसार, १३ मार्च रोजी विनित दुबे यांनी इम्पायर क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केले होते. अनुष्का तिवारी नावाची डॉक्टर याठिकाणी कार्यरत होती. तिने कुठलीही मेडिकल चाचणी आणि एलर्जी टेस्ट न करताच विनित यांच्यावर हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी केली. सर्जरीनंतर काही तासांतच विनित यांनी तब्येत बिघडली. सर्जरीमुळे विनित यांचा चेहरा सुजला होता. प्रकृती अधिकाधिक खालावत जात होती. विनित प्रकृती अस्वस्थतेमुळे दोनदा अनुष्का तिवारी यांच्या क्लिनिकला भेट दिली. कुटुंबाला याची कल्पना नव्हती. मात्र विनित दुबे यांच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा झाली नाही. १४ मार्च रोजी डॉ. अनुष्का यांनी विनित यांच्या पत्नी जया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली आणि फोन बंद केला.

पत्नी जया आणि घरच्यांनी विनितला हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु उपचारावेळी १५ मार्च रोजी विनित दुबे यांचा मृत्यू झाला. विनितच्या मृत्यूनंतर डॉ. अनुष्का क्लिनिक बंद करून फरार झाल्या. विनितच्या मृत्यूआधी पत्नी जया यांनी स्वत: डॉ. अनुष्का यांच्याशी चर्चा केली तेव्हा योग्यरित्या हेअर ट्रान्सप्लांट झाले नाही त्यामुळे विनित यांना इंफेक्शन झाले अशी कबुली डॉक्टरांनी दिल्याचे म्हटलं. या घटनेत पत्नीच्या तक्रारीवरून हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या महिला डॉक्टरविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तपासात डॉ. अनुष्का या हरियाणातील मूळ रहिवासी असून कानपूर येथे कुठल्याही मेडिकल डिग्रीशिवाय क्लिनिक चालवत असल्याचे समोर आले. या प्रकरणी २ महिन्यांनी विनित दुबे यांच्या पत्नीने आवाज उचलताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. हेअर ट्रान्सप्लांट ही संवेदनशील सर्जरी आहे ज्यासाठी एखाद्या प्रशिक्षित आणि अनुभवी डॉक्टरची गरज असते. कुठल्याही एलर्जी टेस्टशिवाय केलेली सर्जरीतून ब्लिडिंग, इंफेक्शन, सूज येणे, जळणे यासारख्या समस्या जाणवू शकतात, हे जीवावरही बेतू शकते. त्यासाठी जर तुम्ही एखाद्या हेअर ट्रान्सप्लांटकडे जात असाल तर प्रमाणित आणि अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एक चुकीचा निर्णय आपल्या आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *