महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले……..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मे ।। आगामी महापालिका निवडणूक महायुती की उद्धवसेना यांच्यासोबत लढवायची की पुन्हा एकदा स्वबळावर लढायचे याचा योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्यात येईल. मात्र, सध्या युतीबाबत कोणतीही विधाने करू नका, अशा स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकत्र येण्याबाबतचे विधान, शिवतीर्थ निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्नेहभोजन, शिंदेसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चार वेळा राज ठाकरे यांची घेतलेली भेट यामुळे महापालिका निवडणुकीत ते काय भूमिका घेणार याची चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे, राज ठाकरे यांनी या चर्चांकडे फारसे लक्ष न देता आपले लक्ष नेते, पदाधिकारी यांच्यासाठी बनविण्यात येणाऱ्या आचारसंहितेकडे वळविले आहे. त्यासाठी ते नेते, महत्त्वाचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करत आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले.

उमेदवारांची चाचपणी
मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. यासाठी मुंबई स्तरावर बैठका घेऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने मुंबईतील उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, उमेदवारी देण्याबाबतचा अंतिम निर्णय अध्यक्ष राज ठाकरेच घेतील, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *