महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मे ।। पीएमपीचे नवीन आणि भव्य मुख्यालय आता साडेतीन एकराच्या जागेत उभारले जाणार आहे. स्वारगेट येथील या मुख्यालयाचा समावेश आगामी काळात येथे होणार्या मेट्रो हबमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच नवीन आराखडा तयार केला जाणार आहे.
मेट्रोच्या नेतृत्वात हे काम लवकरच सुरू होणार आहे. पीएमपीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे कामाला आता वेग आला असल्याचे आणि प्रशासकीय पातळीवर वेग आल्याचे चित्र दिसत आहे. (Latest Pune News)
मेट्रो हबमध्ये होणार समावेश –
स्वारगेट येथे होणार्या मेट्रो हबमध्ये पीएमपीचे नवीन मुख्यालय विकसित होणार असल्याने प्रवाशांना आणि कर्मचार्यांना याची मोठी सोय होणार आहे. पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार स्वारगेट येथे मेट्रो तर्फे मेट्रो हब तयार करण्यात येणार आहे. या हबकरिता आमचे जुने मुख्यालय पाडण्यात येणार आहे.
पाडल्यानंतर आम्हाला त्यादरम्यान वेगळी तात्पुरती जागा देण्यात येणार आहे. यानंतर येथे मेट्रो हब तयार झाल्यावर त्यामधील साडे तीन एकराच्या जागेत अत्याधुनिक स्वरूपातील पीएमपीचे मुख्यालय असणार आहे. याकरिताचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला होता, त्याला मान्यता देण्यात आली आहे, यामुळे मेट्रो हब उभारणीच्या कामाचा वेग वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.
नवा आराखडा तयार होणार
नवीन मुख्यालयाच्या उभारणीसाठी आता एक आधुनिक आणि सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात प्रशासकीय कार्यालये, कर्मचार्यांसाठी आवश्यक सुविधा, प्रशिक्षण केंद्र आणि बस डेपोसाठी पुरेशी जागा यांचा समावेश असेल. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे मुख्यालय विकसित केले जाणार आहे. या सर्व कामाकरिता नोडल शासकीय संस्था म्हणून महामेट्रो काम पाहणार आहे.
पीएमपीसाठी नवीन मुख्यालय उभारणे, ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. साडेतीन एकरात हे मुख्यालय मेट्रो हबमध्ये येत असल्याने कनेक्टिव्हिटी चांगली राहील. संचालक मंडळाने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे आता मेट्रोकडून लवकरच आराखडा तयार करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल. दरम्यान, याकरिता आम्हाला 4.5 टक्के शुल्क भरून मेट्रो सोबत करार (अॅग्रीमेंट) करावा लागणार आहे. हा करार आता लवकरच केला जाईल.