स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मे ।। आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. मात्र, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, त्या ठिकाणी मित्र पक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत. त्यामुळे शक्य तिथे महायुती करून अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढू आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येऊ, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्या यशदा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १२० दिवसांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात मला अडचण वाटत नाही. निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आम्ही वेळेत निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. सरकार आवश्यक ते सहकार्य करेल.

ही निवडणूक कार्यकर्त्यांची…
फडणवीस म्हणाले, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्ते दीर्घकाळ काम करतात, त्यांना निवडणूक लढवावी, असे वाटणे साहजिकच आहे. अपवादात्मक ठिकाणी जेथे स्वतंत्र निवडणूक लढू, तेथे एकमेकांवर टीका न करता सकारात्मक प्रचार करू. मात्र, जास्तीतजास्त ठिकाणी महायुती करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

एकनाथ शिंदे म्हणतात, आताही एकत्रच लढणार
आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढलो. आता येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकाही आम्ही महायुतीच्याच माध्यमातून लढणार आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘आधी लढाई अन् नंतर दिलजमाई’
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही महायुती एकत्र राहिली तर मोठे यश मिळेल असे म्हटले जाते. मात्र, सोबतच एकत्र लढल्याने महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर, ‘आधी लढाई अन् नंतर दिलजमाई’ असे सूत्र असू शकते असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आजच्या विधानाने मिळाले आहेत.

महायुतीत एकत्र लढणे कुठे-कुठे असेल अपरिहार्य?
महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीसे निराशेचे वातावरण आहे. तर राज्य आणि केंद्रात सत्ता असल्याने महायुतीचे मनोबल उंचावलेले आहे. राज्यात गेल्या सात ते आठ वर्षांपासून बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. महायुतीत इच्छुकांची गर्दी प्रचंड असेल. अशावेळी याही निवडणुकांना महायुती एकत्रितपणे सामोरे गेली तर ठिकठिकाणी वादाच्या ठिणग्या पडतील आणि त्याचे चटके महायुतीला बसण्याची शक्यता आहे. त्यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ‘आधी बेकी, मग एकी’ या स्वबळाच्या फॉर्म्युल्याचे सुतोवाच केले असे म्हटले जाते. सगळीकडेच महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढतील अशी शक्यता नाही. मुंबई, पुणे, नाशिकसह काही महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये महायुती करणे अपरिहार्य असेल असेही म्हटले जाते. सगळीकडेच स्वबळावर महायुती लढली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *