महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मे ।। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील मुढाळे येथे 33 /11 के व्ही. विद्युत उपकेंद्र भूमिपूजन पार पडले आहे. यावेळी अजित पवार यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. आता लाडक्या बहिणींना आम्ही कर्ज देखील देणार आहोत. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान लाडकी बहीण योजना सुरू केली होती.
अजित पवार पवार म्हणाले की, आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप आम्ही देत आहोत. यासाठी 24000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एक लाख तीस हजार घरांकरिता 500 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा संच आम्ही बसवलेले आहेत. येणाऱ्या काही काळात राज्यातील ग्राहकांचे 70 टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. टेक्निकल लोकांनी आम्हाला सांगितले की, हे शून्यावर येणार आहे पण मला ते ऐकून भीतीच वाटते ते शून्यावर नाही आले म्हणजे लोक म्हणतात थापा मारतोय.
शेतकऱ्यांचा आणि लोकांचा आपण फायदा करून देत आहोत. अजित पवार पुढे म्हणाले, मी परवा महिंद्रा कंपनीची इलेक्ट्रिक 32 लाखांची गाडी घेतली. कंपनीने 500 किलोमीटरचा दावा केला आहे पण साडेतीनशे किलोमीटर तर ती एकदा चार्ज केल्यावर चालते. मुंबईवरून यायचं इथं आपलं फुकट बारामतीमध्ये पोहोचायचं. महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर आम्ही आता चार्जिंग स्टेशन करत आहोत त्याशिवाय गत्यंतर नाहीये. काळानुरूप आपल्याला बदलावी लागेल.