Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा जणांना अटक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मे ।। पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरविल्याबद्दल सहा भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हरियाणाच्या एका यूट्यूबर तरुणीचाही समावेश आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांची साखळी हरियाणा आणि पंजाबमध्ये सक्रिय असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे. या साखळीत एजंट, आर्थिक सहाय्य करणारे आणि माहिती पुरविणारे लोक कार्यरत आहेत. हिसारमधील सिव्हिल लाईन्स पोलिसांनी सहा जणांना अटक केली.

यूट्यूबर तरूणीचे नाव ज्योती मल्होत्रा असून तिचे यूट्यूबवर ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाचे चॅनेल आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्राने कमिशन एजंटकडून व्हिसा मिळवून २०२३ साली पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यात दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिश या व्यक्तीशी तिचा संबंध आला.

भारत सरकारने दानिशला पर्सन नॉन ग्रेटा (अनावश्यक व्यक्ती) घोषित करून त्याची उच्चायुक्तालयातून १३ मे २०२५ रोजी हकालपट्टी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्यानेच ज्योतीची पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी (PIOs) करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ज्योती पाकिस्तानी ऑपरेटिव्ह शाकिर ऊर्फ राणा शाहबाजच्या संपर्कात होती. याचा फोन नंबर तिने जट रंधवा या नावाने सेव्ह केला होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानबद्दल सकारात्मक चित्र निर्माण करण्याचे काम पाकिस्तानी हँडलर्सकडून ज्योतीला देण्यात आले होते, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने त्यांच्या वृत्तात दिली आहे. सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीत २०२३ साली पाकिस्तानच्या दौऱ्याबाबत ज्योतीने सांगितले की, ती एका शिष्टमंडळाचा भाग होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *