महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मे ।। दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर आम आदमी पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. आम आदमी पक्षातील काही शिलेदारांनी दिल्ली महापालिकेत नव्या गटाची घोषणा केली आहे. दिल्ली महापालिकेत आता तिसरी आघाडी पाहायला मिळणार आहे. या आघाडीचे प्रमुख मुकेश गोयल असणार आहेत. मुकेश गोयल यांच्या पक्षाचं नाव इंद्रप्रस्थ विकास पक्ष असणार आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील महापालिकेत मोठा बदल झाला होता. मुकेश गोयल यांनी राज ठाकरे यांच्या सारखी भूमिका घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.
तिसरी आघाडी म्हणजे इंद्रप्रस्थ विकास पक्षाचे अध्यक्ष मुकेश गोयल असणार आहेत. तिसऱ्या आघाडीसाठी राजीनामा देणाऱ्यांमध्ये १५ नगरसेवकांचा समावेश आहे. यात हेमनचंद गोयल, दिनेश भारद्वाज, हिमानी जैन, उषा शर्मा, साहिब कुमार, राखी कुमार, अशोक पांडेय, राजेश कुमार, अनिल मीणा, देवेंद्र कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. १३ जणांनी मुकेश गोयल यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. तर दोघांचं अद्याप ठरलेलं नाही.
सर्व नगरसेवकांनी एकच कागदावर सही करत भूमिका स्पष्ट केली आहे. याच कागदावर राजीनाम्याची देखील घोषणा केली आहे. तसेच यात राजीनाम्याचे कारण देखील नमूद केलं आहे. राजीनामा देणारे सर्व नगरसेवक हे दिल्ली महापालिकेच्या २०२२ साली झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून निवडून आले होते. दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाची सत्ता येऊनही पक्षातील अंतर्गत वाद हाताळण्यास अरविंद केजरीवालांना जमलं नाही.
दिल्ली महापालिकेच्या आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये समन्वय नसल्याने पक्षाला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. लोकांना दिलेले आश्वसान पूर्ण न केल्याने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व राजीनामा दिला आहे. या नगरसेवकांनी राजीनामा दिल्याने दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे