महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मे ।। श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणारे मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि व्हीआयपींचा सत्कार करण्यासाठी मंदिर समितीने एक राजशिष्टाचार व सत्कार समिती गठित केली आहे. यामध्ये मंदिर समितीच्या पाच विभाग प्रमुखांची नियुक्ती केली आहे. यापुढे सत्कार समितीकडूनच व्हीआयपींचे सत्कार केले जाणार आहेत. मंदिर समितीमध्ये प्रथमच अशा प्रकारची सत्कार समिती नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी जशी भाविकांची मांदियाळी असती, तशीच मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्हीआयपींचीही सतत मांदियाळी असते. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक व्हीआयपींचा मंदिर समितीचे अधिकारी किंवा सदस्यांकडून योग्य सन्मान व्हावा, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र अलीकडे मंदिरात दर्शनासाठी येणारे मंत्री, वरिष्ठ अधिकारी व व्हीआयपींचा योग्य प्रकारे सन्मान केला जात नसल्याचे दिसून आले आहे.
नुकतेच राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे श्री विठ्ठल दर्शनासाठी मंदिरात आले होते. मंत्री महोदय मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाला असूनही एकही जबाबदार अधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे सेवक असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या हस्ते मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर या सत्काराची सर्वत्र चर्चा झाली होती. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनाही नाराजी व्यक्ती केली होती. सेवकाकडून कॅबिनेट मंत्र्यांचा सत्कार या मथळ्याखाली मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सत्काराची बातमी ७ मे रोजीच्या दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती. बातमी प्रसिद्ध होताच खडबडून जागे झाले.
त्यानंतर मंदिर समितीने मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि व्हीआयपींच्या सत्कारासाठी मंदिरातील पाच विभाग प्रमुखांची एक राजशिष्टाचार व सत्कार समिती गठित केली. या समितीमध्ये समावेश असलेल्या विभाग प्रमुखांनाच व्हीआयपींचा विशेष सत्कार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या समितीमध्ये पांडुरंग बुरांडे, राजेंद्र सुभेदार, संजय कोकीळ, राजेश पिटले व संदीप कुलकर्णी या पाच विभाग प्रमुखांचा समावेश करण्यात आला आहे.
सत्कारासाठी नियमावली तयार करण्याची गरज
श्री विठ्ठल दर्शनासाठी येणारे व्हीआयपी, देणगीदार यांचा मंदिर समितीकडून यथोचित मान सन्मान होणे आवश्यक आहे. पण अनेक वेळा मंदिर समिती सदस्य आणि मंदिरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मर्जीतील काही खास व्यक्तींचा अनेक वेळा सत्कार करून वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला जातो. अशा फुकट बाबूरावांच्या सत्कारामुळे मंदिर समितीला हकनाक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे व्हीआयपी सोडून अन्य व्यक्तींच्या सत्काराबाबत देखील मंदिर समितीने एक धोरण व नियमावली तयार करावी, अशी मागणीही वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल महाराज पाटील यांनी केली आहे.