Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणी योजनेत वाढ; दरमहा २१०० रुपयांचा प्रस्ताव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मे ।। लाडकी बहीण योजनेतून महिलांना सध्या दरमहा दिली जाणारी १,५०० रुपयांची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचा निर्णय महायुती सरकार योग्य वेळी घेईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी (ता.१७) परभणीत स्पष्ट केले.

डॉ. गोऱ्हे या दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर असून, शनिवारी व्यंकटेश मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि लाडक्या बहिणींशी त्यांनी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, सरकारी निधीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून हे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. प्रामाणिक लाभार्थ्यांनी यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगून, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आरोग्य शिबिरे आयोजित करून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

या कार्यक्रमास परभणी लोकसभा प्रमुख राजू कापसे, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, महिला जिल्हाप्रमुख गीता सूर्यवंशी, सखुबाई लटपटे, उपजिल्हा प्रमुख माणिकराव पोंढे पाटील, अप्पाराव वावरे,अशोक पटवर्धन, माधव कदम, ॲड. प्रीती घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्णय
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणी मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लोकसंपर्क वाढवण्यासाठी दोन-दोन हजार लोकांचे गट तयार करण्यात येणार आहेत. येणाऱ्या जून-जुलै महिन्यात, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले सोप्या पद्धतीने मिळावेत, यासाठी समाधान शिबिरे आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *