महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मे ।। जर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असेल; तर आमचीही स्वबळाची तयारी आहे, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. १७) दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल जे बोलले, त्याला माझे समर्थन आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील खरीप हंगाम आढावा बैठक झाल्यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अपवादात्मक ठिकाणी जेथे दोन्ही पक्ष तुल्यबळ आहे, तेथे कार्यकर्त्यांना दुखावून चालणार नाही, अशा काही ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली जाईल, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पुण्यात दिला. याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी त्यांच्या विधानाला समर्थन असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर नुकतेच गुन्हे दाखल झाले.
त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यावर पवार म्हणाले, ‘‘अशा प्रकरणात राजीनामा देणे योग्य असते. कारण, पदावर असल्यास जास्त दडपण येते. त्यामुळे आता येथून पुढे पोलिसांना आपल्या पद्धतीने कारवाई करता येईल. मानकर यांच्यावर कोणतेही दडपण अथवा दबाव असणार नाही. तसेच, मी पुणे पोलिस आयुक्तांना कोयता गँगवर कारवाई करण्यास सांगितले आहे. यामध्ये सत्ताधारी पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा कोणीही सहभागी असेल, त्यांची गय करू नका असे सांगितले आहे.’’
‘‘पुरंदर विमानतळासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. अशावेळी चर्चेतून मार्ग काढायचा असतो. जमिनी आणि घरे संपादित होत आहेत, अशांचा विरोध आहे. मात्र, सात गावांमधील सुमारे ६० टक्के जमीन अन्य लोकांनी खरेदी केली आहे. मधल्या काळात जमीनमालक जमिनी देण्यास तयार झाले आहेत. जे जमीन देण्यास तयार असतील, त्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू केली आहे.’’
– अजित पवार, उपमुख्यमंत्री