महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ मे ।। जिल्ह्यासह राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने त्याचा परिणाम फळभाज्यांच्या तोडीवर झाला आहे. रविवारी (दि. 25) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक गत आठवड्याच्या तुलनेत दहा ट्रकने घटली.
रविवारी बाजारात 80 ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने टोमॅटो, आले, फ्लॉवर, भुईमूग शेंग व ढोबळी मिरचीच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. (Latest Pune News)
उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक- जावक कायम असल्याने गत आठवड्यातील दर टिकून होते. तर, बाजारात दाखल होणार्या मालामध्ये भिजलेल्या व दर्जाहिन मालाचे प्रमाण जास्त होते. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, इंदौर येथून गजर 3
टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक येथून 1 टेम्पो भुईमुग शेंग, हिमाचल प्रदेश 3 ते 4 टेम्पो मटार, कर्नाटक येथून पावटा 1 टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी 3 ते 4 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 30 ते 35 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 300 ते 400 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 2 ते 3 टेम्पो, टोमॅटो 4000 ते 4500 पेटी, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, कोबी 3 ते 4 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, गाजर 2 ते 3 टेम्पो, भुईमूग शेंग 40 ते 50 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 50 टेम्पो इतकी आवक झाली.
पालेभाज्या कडाडल्या
पावसाचा फटका पालेभाज्यांच्या काढणीवर झाला आहे. काढणी कमी झाल्यामुळे आवक कमी झाली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात दाखल होणार्या मालामध्ये 75 टक्के माल दर्जाहिन व भिजलेला आहे. ग्राहकांकडून मात्र दर्जेदार मालाला मागणी आहे.
येथील बाजारात कोथिंबिरीची सुमारे 90 हजार जुडींची आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे, तर मेथीची आवक घटली आहे. मागील आठवड्यात 60 हजार जुडी आवक झालेली मेथी आज 40 हजार जुडी आवक झाल्याची माहिती व्यापारी अमोल घुले यांनी दिली.