महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ मे ।। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकत्याच सुरू झालेल्या ‘उडान यात्री कॅफे’ ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना उत्तम दर्जाचे पदार्थ आणि आरामदायी वातावरण यामुळे या कॅफेला प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत असून, दिवसाकाठी सरासरी 20-22 हजारांपर्यंत उलाढाल होत आहे, मात्र आतापर्यंत कॅफेची सर्वाधिक उलाढाल (28 हजार 130 रु.) 16 मे रोजी झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली. 
प्रवासाच्या धावपळीत अनेकदा प्रवाशांना जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शिवाय परिसरात मिळणार्या खाद्यपदार्थांचे दरही न परवडणारे असल्याने शक्यतो नागरिक तिकडे वळत नाहीत; मात्र ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू झालेल्या ‘उडाण यात्री कॅफे’मध्ये चांगल्या दर्जाचे किफायतशीर दरात पदार्थ मिळत असल्याने प्रवाशांकडून विशेष पसंती मिळत असून, प्रवाशांची आता गर्दीही वाढत आहे. मागील शुक्रवारी (दि.16) या कॅफेमध्ये एकूण 1280 युनिट्सची विक्री झाली असून, 28 हजार 130 रुपयांची दिवसभरात उलाढाल झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.