महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मे ।। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. काल (२८ मे) हगवणे कुटुंबातील पाच जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. यातील शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांना एका दिवसाची कोठडी सुनावण्यात आल्याने आज पुन्हा तिघांना पिंपरी चिंचवड न्यायालयासमोर हजर केले.
वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे या तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. एका दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्याने आज (२९ मे) पुन्हा त्यांना न्यायालयासमोर सादर केले गेले. या तिघांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर लगेच करिष्मा आणि लता हगवणे यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काल न्यायालयाने वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. काल न्यायालयात झालेल्या युक्तिवादाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. युक्तिवादावर वैष्णवीच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली. हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी म्हटले.
एका बाजूला शशांक, लता आणि करिष्मा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला शशांकचे मामा जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने दणका दिला. जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला. सुपेकर यांचे नाव वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणात जुळवण्यात आले होते.