Weather Update पावसाची क्षणभर विश्रांती : पहा पुढील ४ दिवस कसे असेल हवामान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जून ।। पुण्यामध्ये ऐन उन्हाळ्यात वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने यंदा विक्रम नोंदवला आहे. पुण्यासाठी पावसाची मे महिन्याची सरासरी ४३ मिलिमीटर असताना या वर्षी ३१ मे अखेरीस २५७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एवढेच नव्हे, तर चिंचवड, एनडीए-कोथरूड परिसर, बारामती, दौंड या भागातील नागरिकांनी ऐन उन्हाळ्यामध्ये २४ तासांत शंभर मिलिमीटर पावसाचाही यंदा अनुभव घेतला.

मार्च आणि एप्रिल महिन्यात पुणेकरांनी यंदा तीव्र उन्हाळा अनुभवला. मार्च महिन्यातच नागरिकांना पहिल्या उष्णतेच्या लाटेला सामना करावा लागला. एप्रिल महिन्यात ऊन अधिक तीव्र झाले होत. बहुतांश महिना तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या जवळच रेंगाळला होता. सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा, दुपारी उन्हाचे चटके आणि रात्री असा उकाडा अनुभवल्यानंतर आता मे महिन्यात आता काय होणार अशी पुणेकरांनी चिंता होती.

महिन्याच्या पहिल्या आठवडयात तापमान ४० अंश सल्सिअसच्या जवळ रेंगाळले होते; पण दुसऱ्या आठवड्यात चित्र बदलले आणि वादळी वाऱ्यासह शहरासह जिल्ह्यात चौफेर पावसाला सुरुवात झाली. मे महिन्याचे शेवटचे दोन्ही आठवडे दररोज पावसाने हजेरी लावली. या वेळेचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्व मोसमी पाऊस पडल्यानंतर पुन्हा उकाडा वाढतो; पण या वेळी पावसाचा मुक्काम वाढल्यामुळे तापमानाचा पारा या हंगामातील नीचांकी खाली गेला. महिनभरातील बारा दिवस तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले.

शेतकऱ्यांचे नुकसान
वादळी वारा, वीजेच्या कडकडाटासह जोरदार बरसलेल्या सरींमुळे काही भागात पूर सदृश परिस्थितीही निर्माण झाली होती. बारामती, दौंड, सासवड भागात अतिवृष्टीसदृश पावसामुळे पूरसदृश चित्र बघायला मिळाले.

मान्सून लवकर दाखल
गेल्या आठवड्यात पुणेकरांना सूर्यदर्शनाचीही प्रतीक्षा करावी लागली. वातावरणातील अनुकूल बदलांमुळे मान्सूनचेही या वर्षी अलीकडे म्हणजे २६ मे रोजीच आगमन झाले. मे महिन्यातील या पावसाने शहराचा ६४ वर्षांतील विक्रम मोडला. या पूर्वी १९६१ मध्ये मे महिन्यात शिवाजीनगर येथे उच्चांकी १४८.८ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला होता. या वर्षी ३१ मे पर्यंत २५७.९ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.

नोंद पूर्वमोसमी श्रेणीमध्ये
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार ३१ मे महिन्यापर्यंतच्या पावसाची पूर्व मोसमी पावसाच्या श्रेणीमध्ये नोंद केली जाते. एक जूनपासून पडणारा पाऊस हा मान्सून श्रेणीतील पाऊस नोंदवला जातो. त्यामुळे मे महिन्यातील या उच्चांकी पावसाची मान्सूनच्या पावसामध्ये गणना होणार नाही. धरणात पडलेल्या पावसामुळे मात्र, पुणेकरांची पाणी कपात करण्याच्या निर्णयापासून सुटका झाली.

चार दिवस पावसाची विश्रांती
पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहणार असून, दुपारी आणि संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील. तापमानातही थोडी वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढणार आहे. अनुकूल परिस्थितीअभावी पुण्यात आठवडाभर पावसाची शक्यता नाही, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *