महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जून ।। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या ७६ किमीच्या टप्प्याच्या लोकार्पणाला अखेर मुहुर्त मिळाला आहे. गुरुवारी, ५ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे एका सोहळ्यात या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. गुरुवारीच हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे.
मुंबई आणि नागपूर या दोन शहरातील प्रवासाचे अंतर १६ तासांवरुन आठ तासांवर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून ७०१ किमीचा नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. या महामार्गातील नागपूर ते इगतपुरी असा ६२५ किमीचा टप्पा सध्या वाहतूक सेवेत आहे. तर इगतपुरी ते आमणे टप्प्याचे काम एप्रिलमध्ये पूर्ण झाले आहे. ५ जूनला या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.