महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जून ।। हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या ७६ कि.मी. अंतराच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी (ता. पाच) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांच्या विकासाला चालना देणारा मार्ग म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जात आहे.
नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते, तर समृद्धी महामार्गाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकणमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंजदरम्यान दुसऱ्या टप्प्यातील ८० कि.मी. लांबीचे लोकार्पण २६ मे २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरीपर्यंतच्या २५ कि.मी.च्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण चार मार्च २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले होते. तर आता समृद्धी महामार्गाची उर्वरित ७६ कि.मी. लांबीचे (इगतपुरी ते आमणे) लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील.
समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये
देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले. या टप्प्यामध्ये एकूण पाच दुहेरी बोगदे. कसारा घाट मार्गाला पर्यायी मार्ग. भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा. या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा हे अंतर पार.
या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल (व्हायाडक्ट) २.२८ कि.मी लांबीचा. या टप्प्यात एका ठिकाणी (व्हायाडक्ट-२) पुलाच्या काही खांबांची उंची ८४ मीटरपर्यंत. तीन ठिकाणी इंटरचेंजेस. या टप्प्यात इगतपुरी, खुटघर व आमणे येथे इंटरचेंज येतात. एक रेल्वे ओलांडणी पूल बांधण्यात आलेला आहे. राज्याच्या पाच महसूल विभागाच्या १० जिल्ह्यांतील २६ तालुक्यांमधील ३९२ गावांमधून जाणारा हा सहापदरी महामार्ग ग्रीन फिल्ड संरेखण.
जुन्या नागपूर-मुंबई मार्गावरून नागपूरहून मुंबईकडे येण्यास १७-१८ तास लागतात. नवीन ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेने हा प्रवास आठ तासांत करणे शक्य झाले आहे. हा महामार्ग दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी, अजिंठा-वेरूळ लेणी, लोणार सरोवर आणि इतर पर्यटनस्थळांना जोडणारा.