महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जून ।। सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नद्या-नाले खळाळून वाहत आहेत. तसेच धरणांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. आता पुन्हा राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 24 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण : कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात पाऊस कधी कोसळणार ? वाचा हवामान विभागाचा अंदाज –
मॅान्सून विदर्भात सक्रीय होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे. विदर्भात १३ ते १४ जूनच्या सूनरास मॅान्सून सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २८ मे रोजी गडचिरोलीत पोहोचलेला मॅान्सून आठ दिवसांपासून तिथेच खोळंबला आहे. १३ ते १४ जूनला पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात मॅान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
१७ ते २० जूनपर्यंत मॅान्सून पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सक्रिय होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात तापमानाचा चढ-उतार सुरू राहील, तापमान 39 ते 40 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उकाड्याचा त्रास आणखी काही दिवस असाच सहन करावा लागणार आहे.