समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार ! असा असेल नवीन महामार्ग ; मुख्यमंत्री फडणवीसांनीच मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जून ।। हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा 5 जून रोजी नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. मुंबईतून नागपूरला पोहोचण्यासाठी 14 ते 15 तासांचा कालावधी लागतो मात्र समृद्धी महामार्गामुळं नागरिकांचा हा प्रवास 8-10 तासांत पूर्ण होणार आहे. 701 किलोमीटरचा हा महामार्ग आता वाहनांसाठी खुला झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

समृद्धी महामार्गाचा 76 किमीचा शेवटचा टप्पा गुरुवारपासून सेवेत दाखल होणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याचबरोबर, या मार्गामुळं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत. त्याचबरोबर आता हा महामार्ग पालघरमधील वाढवण बंदराशीदेखील जोडला जाणार आहे. हे दोन्ही बंदरे महामार्गाला कनेक्ट झाल्याने झपाट्याने विकास होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

कसा असेल वाढवण बंदरचा मार्ग?
इगतपूरी ते वाढवण असा 123.4 किमीचा नवा मार्ग तयार करण्यात येणार आहे. या नव्या मार्गामुळं इगतपुरी येथून दीड ते दोन तासांत वाढवण बंदरापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. लवकरच या महामार्गाचे काम सुरू होणार आहे. या नव्या महामार्गामुळं विदर्भ, मराठवाड्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट बंदरापर्यंत पोहोचवता येणार आहे.

समृद्धी महामार्ग नाशिक, शिर्डी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांना थेट कनेक्ट करणार आहे. यामुळं धार्मिक स्थळांचे पर्यटनदेखील वाढणार आहे. प्रवासी मुंबई ते शिर्डी फक्त 3 तासांत आणि मुंबई ते छत्रपती संभाजी नगर फक्त 4 तासांत पोहोचता येणार आहे. समृद्धी महामार्गाचा 76 किमीचा मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असल्यामुळं या मार्गावर 17 पुल आणि 5 बोगदे बांधण्यात आले आहेत. तर यामुळं नागरिकांना इगतपुरी ते कसारापर्यंतचा प्रवास फक्त 8 मिनिटांत करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *