Ashadhi Wari 2025: विठ्ठल विठ्ठल ! आषाढीनिमित्त पुण्यातून धावणार ७५० बसेस, असे आहे नियोजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जून ।। आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने जोरदार तयारी केली आहे. यंदा प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून साडेसातशे गाड्या पंढरपूरसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठी असते.

गेल्या काही वर्षांपासून आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुणे विभागातील १४ आगारांतून पंढरपूरसाठी गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सहा जुलै रोजी आषाढी यात्रा असल्यामुळे अगोदर काही दिवसांपासून गाड्या सोडण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी एसटीच्या पुणे विभागाने एकूण साडेसातशे बस सोडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापैकी साडेतीनशे बस या पुणे विभागाच्या असणार आहेत. तर, इतर चारशे बस मुंबई व विदर्भ विभागातून मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा पंढरपूरला एसटी महामंडळाच्या बसने जाणाऱ्या वारकऱ्यांना बसची कमतरता भासणार नाही. गेल्या तीन-चार वर्षांतील गाड्यांच्या तुलनेत यंदा एसटीकडून जादा गाड्या सोडण्यात आल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्वारगेट, शिवाजीनगर आगारांतून मोठ्या प्रमाणात बस सोडण्यात येणार आहेत. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

आषाढीसाठी एसटी बसचे नियोजन
गेल्या वर्षी आषाढीसाठी सोडलेल्या बस —–५५८
बाहेरील विभागातून मागवलेल्या बस —–४००
पुणे विभागाच्या बस —–३५०

गावातून एसटीची सोय
एकाच गावातील वारकऱ्यांनी समूहाने एसटीचे बुकिंग केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्याची व्यवस्था एसटी प्रशासनाने केली आहे. ४० जणांच्या समूहाने एकत्र बुकिंग केल्यास त्यांच्या गावात जाऊन एसटी प्रवाशांना पंढरपूर येथे सोडेल. त्यानंतर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधी एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी प्रशासने केले आहे.

पुणे एसटी विभागाने आषाढीसाठी सोडण्यात येणाऱ्या बसचे नियोजन केले आहे. त्यानुसार यंदा बसची संख्या वाढविण्यात आली आहे; तसेच या वर्षी नवीन बसदेखील वारीसाठी सोडण्यात येणार आहेत. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. -अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *