महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जून ।। भारतात अनेक राज्यं आहेत, प्रत्येक राज्यात असंख्य जिल्हे आणि त्या जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळी शहरं आहेत. पण तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की कितीतरी शहरांच्या नावाच्या शेवटी ‘पुर’ किंवा ‘बाद’ असे असते. उदाहरण द्यायचे झाल्यास जयपूर, नागपूर, फरीदाबाद, हैदराबाद ही शहर. लहानपणापासून आपण ही नावं ऐकत आलो आहोत. पण ‘पुर’ आणि ‘बाद’ म्हणजे काय? आणि हे शब्द नावात का जोडले जातात? हा प्रश्न सोशल मीडियावर चांगलाच गाजला आणि त्याचे उत्तर अनेकांना थक्क करणारे ठरले.
‘पुर’ म्हणजे काय?
‘पुर’ हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे आणि त्याचा अर्थ ‘नगर’ किंवा ‘शहर’ असा होतो. प्राचीन काळात जेव्हा राजे-महाराजे नवीन शहरं वसवत, तेव्हा त्या शहराच्या नावात ‘पुर’ जोडायचे. जसे की, जयपूर हे महाराजा जयसिंह यांनी वसवलं होतं. ‘पुर’चा उल्लेख आपल्याला अगदी ऋग्वेदातही सापडतो, जिथे त्याचा अर्थ किल्ला किंवा वस्ती असा दर्शवतो. यामुळेच अनेक ऐतिहासिक ठिकाणी ‘पुर’ लागलेली शहरं पूर्वी सैन्यदृष्ट्या महत्त्वाची किंवा शासकीय केंद्र होती. काशीपुर, तिरुपूर, नागपूर, कानपूर हे सगळे या परंपरेचेच भाग आहेत.
‘बाद’ म्हणजे काय?
तर, ‘बाद’ हा शब्द पारशी भाषेतून आलेला आहे. मूळ शब्द ‘आबाद’ यावरून हा शब्द आला आहे ज्याचा अर्थ होतो ‘वसलेली जागा’ किंवा ‘समृद्ध नगर’. भारतात जेव्हा मुघल किंवा इतर मुस्लिम सुलतानांनी आपली सत्ता वाढवली. तेव्हा त्यांनी जे शहरं वसवली त्या शहरांच्या शेवटी ‘बाद’ असा शब्द वापरला. जसे हैदराबाद (हैदर अलीच्या नावावरून), अहमदाबाद (अहमद शाह), फरीदाबादअशी नावं. ‘बाद’ असलेली शहरं म्हणजे तत्कालीन शासकांच्या नियोजनशक्ती आणि नागरी व्यवस्थेचं प्रतिक मानले जात होते.
पण खरे पाहिले तर या दोन्ही शब्दातून भारताचा संस्कृतीचा आणि इतिहासाचा समृद्ध वारसा दिसतो.आजच्या काळात नोएडा, गुरुग्राम, चंडीगड अशी नावं असलेली शहर आली असली तरी ‘पुर’ आणि ‘बाद’ चा प्रभाव अजूनही नावांमधून दिसतो. ती केवळ अक्षरे नाहीत, तर आपल्या शहरांच्या मूळ ओळखीचा भाग आहेत.