‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – दि. २७ ऑगस्ट – पिंपरी – ‘चेस दी व्हायरस’ संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे सांगतानाच ‘चेस दी वायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण झाले.

“शाब्बास पुणेकर”.. तुम्ही दिलेल्या वेळेत भव्य असे कोविड रुग्णालय उभारले आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधित असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. ‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, हीच संकल्पना आपण राज्यभरात राबविणार आहोत, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. पावसाळ्याचा कालावधी असल्याने कोरोनासोबतच साथीच्या आजाराची शक्यता विचारात घेत दक्षता घेण्याची गरज आहे. कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, असे सांगतानाच कोरोनाचे निदान करण्यासाठी आवाजावरून चाचणी मुंबईत सुरू केली आहे, ही चाचणी यशस्वी झाली तर कोरोना निदानाच्या मोहिमेत आपण मोठा टप्पा गाठू शकू, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *