महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ जून ।। वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिकेचे संघ या वर्षी भारत दौ-यावर येणार आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौ-यांच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ऑक्टोबरमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांच्या मालिका खेळवल्या जातील.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, पण सुधारित वेळापत्रकानुसार, हा सामना आता नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार होता मात्र, आता तो कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर शिफ्ट करण्यात आला आहे. उर्वरित सामन्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.