महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जून ।। लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची तपासणी होणार आहे. त्यामध्ये निकषांत न बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे.
प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे महिला व बालविकास विभागाला लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे या योजनेत निकषांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांचे अर्ज आता बाद होणार आहे. त्यांना कधीच योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेत महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे, ही अट ठेवण्यात आली होती. तरीही अनेक महिलांचे उत्पन्न जास्त असतानाही त्यांनी अर्ज केले होते. अशा महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.यामुळे लाखो महिलांचे अर्ज बाद केले जाण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे. त्यानंतर जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अद्याप जूनच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु जून महिन्याच्या शेवटपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्यात लाडकीच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जाणार आहे. मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता येणार आहे.