मान्सुन पुन्हा गायब ? या ठिकाणी पारा 44 अंशांवर ; लहरी हवामानानं चिंता वाढवली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जून ।। मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही ऊन पावसाचा खेळ सुरू असून उत्तर महाराष्ट्रातही हेच चिन्हं आहे. सध्यातरी राज्याच्या कोणत्याही भागाला तूर्तास पावसाचा ऑरेंज किंवा यलो अलर्ट जारी करण्यात आला नसून, उलटपक्षी विदर्भात उकाडा वाढणार असल्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.

मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असून, नागपुरात सोमवारी 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. तर, विदर्भात आठ जिल्ह्यांत तापमान 41 अंशांपलीकडे असल्याचं दिसून आलं. प्रत्यक्षात पावसाच्या धारांच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भात घामाच्या धारा वाहत असल्यानं नागरिकही बेजार झाले.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उकाडा वाढत असतानाच राज्यात अहिल्यानगर, पुणे, सांगली, साताऱ्याचा घाटमाथा, सोलापूर, मराठवाड्याचा काही भाग, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकणातील काही भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरींची हजेरी असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामानाच्या स्थितीत नेमका कसा बदल होतोय?
महाराष्ट्राच्या दक्षिणेपासून कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. तर, सुट्टीवर असणारा मान्सून आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली असून, परिणामस्वरुप 12 ते 16 जून दरम्यान महाराष्ट्रात मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर तिथं कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन दिवस तरी मान्सून सक्रिय होणार असल्याची कोणतीच लक्षणं दिसत नाहीयेत. मान्सूनच्या वाऱ्यांना वेग देणारी कोणतीही प्रणाली सक्रिय नसल्यामुळं हे चित्र पाहायला मिळत असून ही प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडत आहे असं म्हटलं जात आहे. त्यामुळं आता 12 जूननंतर प्रत्यक्ष मृग नक्षत्रामध्ये राज्यावर मान्सून मेहेरबान होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *