महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जून ।। आपल्या पक्षात फूट पडेल असं काही वाटत नव्हतं पण पडली. जे राहिले आहेत ते विचारांनी राहिले आहेत. उद्या निवडणुका होतील तेव्हा वेगळं चित्र बघायला मिळेल. त्यामुळे फुटीची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेशी बांधिलकी कायम ठेवली तर काहीही फरक पडत नाही, असे उद्गार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काढले.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज पुण्यात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, 26 वर्षांपूर्वी आपण एकत्र आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन करण्याचा निर्णय घेतला. काही संकटं आली तर नाउमेद न होता पक्षाला पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं आणि पक्षाला उभारी आली. पण, पक्षात फूट फडली, यासंबंधी मी अधिक भाष्य करू इच्छित नाही, असे सांगत शरद पवार यांनी 1980 चे उदाहरण देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. राष्ट्रवादीला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. मला शंभर टक्के विश्वास आहे, येत्या निवडणुकीत चांगले चित्र पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, नीलेश लंके, बजरंग सोनवणे, रणजितसिंह मोहिते-पाटील, सुरेश म्हात्रे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी हा पक्ष सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी देतो. महाराष्ट्राचा चेहरा बदलणाऱया कष्ट करणाऱया कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. तुम्हा सर्वांच्या बांधिलकीवर आणि कष्टावर हा पक्ष उभा आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यावर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्याचा परिणाम राज्यातसुद्धा झाला. मुलींना संधी मिळाल्यानंतर त्यांनी जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले. अगदी सैन्यदलातही ते दिसून आले. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत दोन महिलांनी माहिती देऊन हे सिद्ध केले, असे शरद पवार म्हणाले.
50 टक्के भगिनींना निवडून द्या
जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका दोन-तीन महिन्यांवर आल्या आहेत. कर्तृत्वाचा वाटा पुरुषांचाच असतो यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्यासुद्धा कर्तृत्व दाखवू शकतात. उद्याच्या निवडणुकीत 50 टक्के जागा भगिनींना द्यायच्या आहेत. हा धोरणात्मक निर्णय आपण घेतला आहे. तो यशस्वी करण्याचे काम करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
शेजारी राष्ट्रांबरोबर जाणीवपूर्वक सुंसवाद नाही
राष्ट्रवादीने राष्ट्रहिताच्या बाबतीत कधीच राजकारण केलेले नाही. पहलगाम हल्ल्यानंतरही आम्ही देशहिताची भूमिका स्वीकारली. देशात एक काळ असा होता की, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व आणि भारत हा सगळय़ांना सोबत घेऊन जाण्यासाठी ओळखला जायचा. आज पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंकेसोबत आमचे चांगले संबंध नाहीत. ज्या बांगलादेशसाठी भारताने त्याग केला तो बांगलादेशदेखील आपल्यासोबत नाही. दक्षिणेकडील श्रीलंका आपला मित्र आहे की नाही, याबाबत शंका आहे; कारण तोही चीनच्या प्रभावाखाली आहे. देशाचे नेतृत्व करणाऱयांनी सुंसवादाची परिस्थिती जाणीपूर्वक निर्माण केलेली नाही, त्याची किंमत देशाला द्यावी लागत आहे, अशी टीका पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता केली.